सोलापूर : इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत लॉन टेनिसमध्ये सोलापूरचे डॉ.किरण किणीकर आणि डॉ. आरूष शहा ही जोडी विजेते ठरली. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. त्यामध्ये देशातील सर्व राज्यात कार्यरत असलेले दंत रोग तज्ञांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले.
देशभरातील दंतरोग तज्ञांची संघटना असलेल्या इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने ऑल इंडिया स्पोर्टस समिट २०२३ मुंबई येथील अंधेरी स्पोर्टस कॉम्प्ले्नस मध्ये घेण्यात आले. देशातील दंत रोग तज्ञ एकत्र यावेत, त्यांच्याकडील माहिती आणि विचारांची देवाण घेवाण व्हावी तसेच एकमेकांमधील कला-गुण तसेच क्रिडा गुण समोर यावेत, या हेतुने ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आली होती.
त्यामध्ये सोलापूरचे डॉ. किरण किणीकर आणि डॉ. आरूष शहा यांनी लॉन टेनिस डबलमध्ये आपली चमकदार खेळी दाखवून नागपूरच्या डॉक्टरांशी सामना केला, त्यामध्ये सोलापूरच्या डॉ. किरण किणीकर आणि डॉ. आरूष शहा यांनी विजेतेपद पटकावले. या दोघा डॉक्टरांना मान्यवरांच्या हस्ते विजेतेपदाची गोल्डन ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ.आरूष शहा हे मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सिंगल मध्ये उपविजेतेपद पटकावले.
संपूर्ण देशभरातील दंत रोग तज्ञांच्या या स्पर्धेत सोलापूरच्या या दोन दंत रोग तज्ञांनी आपल्या क्रिडा कौशल्याने लॉन टेनिसमध्ये यश मिळवून संपूर्ण देशातील दंत रोग तज्ञामध्ये सोलापूरचा नावलौकीक वाढवला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. याच स्पर्धेत मागील वर्षी डॉ.किरण किणीकर आणि डॉ. आरूष शहा यांनी लॉन टेनिसमध्ये उपविजेतेपद पटकावले होते आणि यंदाच्या वर्षी त्यांनी विजेतेपद मिळवून आपले क्रिडा कौशल्य सिध्द केले.