Type Here to Get Search Results !

... डोळ्यात पाणी आणणाऱ्या आठवणी उद्या काळाच्या पडद्याआड !

" प्रभात टॉकीज "

सिनेमागृहाला पूर्वी टॉकीज म्हणायचे, "व्हेअर द पीपल टॉक अँड पब्लिक लिसंन्स" असं असावं बहुतेक. सोलापूरच्या प्रत्येकाच्या दीलाची धडकन म्हणजे असंख्य टॉकीज, त्यातलं प्रभात हे जरा थोडं बाजूला असलेलं. बाकी सगळे गुण्यागोविंदाने एकाच इमारतीत राहणारे, अर्थात प्रभात थोडं सगळ्याच बाबतीत वेगळं होतं (स्टँडर्ड का काय ते).
 
इथे "हिंदी" सिनेमाला थोडी सावत्र वागणूक होती, बहुतेक मराठी सिनेमे इथे लागायचे, तुतारी वाजवणाऱ्या दोन बायका म्हणजे प्रभात, दिवसाची सुरूवात म्हणजे प्रभात, तसं नावीन्यपूर्ण, वैचारिक, असे सिनेमे इथे लागायचे. मराठीला जरासं झुकतं माप इथे दिलं जायचं. उमा, छाया, चित्रा, मीना , कल्पना, लक्ष्मी, सगळ्यांचा समजूतदार भाऊ म्हणजे "प्रभात" !

स्वर्गीय दादा कोंडके इथे एकदा येऊन गेले होते, प्रचंड गर्दीत सूट घातलेल्या दादांना कुणी ओळखलं असेल की नाही माहीत नाही, पण गॅलरी समोरच्या खिडकीतून दादांनी सगळ्यांना हात दाखवला होता, लगेच त्यांनी " हात चोळीत गेला " ह्या सिनेमाचं टायटल फिक्स करून टाकलं, (हात दाखवताना त्यांच्या डोक्यात ही आयडिया आली असावी) 

सोलापुरात इतक्या गर्दीत " हिरो " लोकांचं सुद्धा गर्दीत पाकीट मारणारे लोक त्या वेळी  होते. तर या सर्व थिएटर भावंडात प्रभात थोडं हटके होतं  " प्रभात " हा भाऊ मात्र एकदम सोज्वळ, माहेरची साडी, जय संतोषी माँ, वगरे इथे वर्षानुवर्षे पथारी पसरून बसलेले असायचे. संतोषी माँ सिनेमाला तर, तिकिटांच्या रकमेपेक्षा उधळलेली चिल्लर जास्त निघायची. 

शो सुरू व्हायच्या आधी रिक्षा भरभरून बायका यायच्या , हातात ताम्हण, निरांजन, बाटलीत तेल, उदबत्त्या घेऊन मनोभावे संतोषी मातेची पूजा, आरती, मग अंगात येण्याचा कार्यक्रम व्हायचा. नंतर नंतर तर बाहेर हार, उदबत्याची, कुंकवाची दुकानं लागायचंच बाकी राहिलं होतं.

माहेरची साडी तर पहाटेपासून फाटायचीच बाकी राहिली होती आणि अलका कुबल यांच्या अश्रूमुळे पुढे तलावाच्या पाण्यात वाढ झाली, अशी बातमी पण आली होती.
सिंहासन, सामना, असे वैचारिक आणि कलात्मक सिनेमे इथे लागायचे. दादा कोंडके यांचे सगळे सिनेमे सोलापूरकरांनीं इथेच पाहिलेत. प्रभातला सिनेमे उच्य दर्जाचे असायचे त्यामुळे रसिक सुद्धा तसेच असायचे.

प्रभातला धोतर टोपी आणि काळा कोट घातलेले एक तिकीट बुकिंग वर मॅनेजर असायचे. आतल्या बाजूला म्हणजे जिथून सिनेमा दाखवला जायचा, त्याच्या खालीच एक इडलिगृह होतं, पूरिभाजी, इडली वडा एकदम फेमस होता.
दोन्ही गेटच्या मध्यभागी एक पानाचं दुकान होतं, बहुतेक तिकीट ब्लॅक करणारे लोक तिथं घुटमळत असायचे. 

अशा या प्रभात टॉकीजचा उद्या शेवटचा दिवस आहे, कित्येक तरुण तरुणींच्या प्रेमाचं साक्षीदार (आता ते सगळे बहुतेक साठीपार झालेले असतील, पण आठवणी तर हिरव्याच असणार ना ? " आपण मिळून पहिला सिनेमा प्रभातला बघितला होता ना ?" किंवा " आमचं जुळलं ते प्रभात टॉकीज " " ह्येंनी मला पहिला पहिला बघितले, ते प्रभात टॉकीज " !

अशा कितीतरी डोळ्यात पाणी आणणाऱ्या आठवणी उद्या काळाच्या पडद्याआड जाणार आहेत, ज्यांच्या जोड्या इथे जमल्या, ज्यांच्या जोड्या इथे तुटल्या, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा एखादा थेंब तरी टपकणार आहे, शेवटी 'कालाय तस्मै नमः' हेच सत्य आहे. आज सकाळी प्रशांत बडवेंचा मेसेज आला " वैद्य साहेब , उद्या पासून " प्रभात टॉकीज " बंद होतंय, घ्या लिहायला .. न्यूयॉर्क मधे असलो तरी सोलापुरात भरकटणाऱ्या मनाने उचल खाल्ली आणि मोबाईलवर बोटं झरझर फिरायला लागली, 
धन्यवाद.
प्रशांतजी, माझी आठवण ठेवलीत. 
प्रभातच्या सर्व स्टाफला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा !

सतीश वैद्य ( फ्रॉम न्यूयॉर्क )
9373109646☝️