Type Here to Get Search Results !

कुष्ठ रुग्ण व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : दादासाहेब कांबळे

सोलापूर/१६ नोव्हेंबर : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठ रुग्ण व सक्रिय क्षय रुग्ण शोध मोहीम दिनांक २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात शोधलेला एकही रुग्ण औषध उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा क्षयरोग अधिकारी ग्रामीण डॉ. मीनाक्षी बनसोडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिरु दुधभाते, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विलास सरोदे, कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. मोहन शेगर यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे पुढे म्हणाले की, या शोध मोहिमेंतर्गत शोधलेल्या कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांना आरोग्य विभागाने तात्काळ औषध उपचार सुरू करावा. सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या मोहिमेतून नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून औषध उपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच संशयित क्षय रुग्णांची थुंकी  नमुने व एक्सरे तपासणी करून रोगाचे निदान करावे व त्यांना योग्य उपचार द्यावेत. तसेच समाजात कुष्ठरोग व क्षयरोग विषयी जनजागृती करावी असेही त्यांनी सूचित केले.

जिल्ह्यात या मोहिमेचे प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामीण भागातील सर्व घरांचे व शहरी भागात निवडक भागांचे सर्वेक्षण अशा व पुरुष स्वंयसेवक यांच्या पथकाद्वारे करावे. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व मनुष्यबळाला प्रशिक्षण द्यावे. कुष्ठरोग व क्षयरोग निदान न झालेला एकही रुग्ण या शोध मोहिमेत सुटणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. तसेच शोधलेला प्रत्येक रुग्णाला योग्य औषधोपचार करावा अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी कांबळे यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी आरोग्य विभागाची पथके शोध मोहिमेसाठी घरी आल्यानंतर त्यांना सहकार्य करावे व घरातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य विषयक विचारलेली माहिती व्यवस्थित सांगावी असे आवाहन ही त्यांनी केले.

प्रारंभी कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. मोहन शेगर यांनी या मोहिमेंतर्गत कुष्ठरोग शोध मोहिमेची माहिती दिली. मोहिमेअंतर्गत जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील ०७ लाख ३१ हजार ५१८ कुटुंबाची तपासणी करण्यात येणार असून यासाठी २ हजार ७६८ टीम तयार करण्यात आले असून यावर ५५४ सुपरवायझर नियुक्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बनसोडे यांनी सक्रिय क्षय रुग्ण शोधण्याच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती बैठकीत दिली.