Type Here to Get Search Results !

आठवड्याला ४० ते ५० हजार कमिशन मिळवून देण्याच्या आमिषाने जवळपास ०८.४५ लाख रुपयांची फसवणूक


सोलापूर : सोलापूर शहरासाठी आलेले पार्सल देणे-घेणेसाठी स्टॉकिस्टचे काम देणे आहे, असे सांगून त्या बदल्यात दर आठवड्याला ४० ते ५० हजार कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जवळपास ०८.४५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलीय. हा प्रकार १६ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर दरम्यान घडलाय. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी सागर आनंद जाधव (रा. मिरज) आणि अन्य कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

१६ ऑक्टोबर २०२३ रोजी एका अग्रगण्य वर्तमानपत्रात सोलापूर सिटीमध्ये नामाकिंत कंपनीचे स्टॉकिस्ट बना ! दर आठवडयाला ४० ते ५० हजार कमवा !! अशी जाहिरात प्रसिध्द झाली होती. ती जाहिरात वाचून जब्बार इमामसाहेब इंगळगी (वय-६३ वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. ४४, काजल नगर, होटगी रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या नंबरवर फोन केला असता, सागर जाधव याने जब्बार इंगळगी यांना सर्व कामाबाबत माहिती सांगितली, त्याप्रमाणे ते सदरचे काम करण्यास तयार झाले.

जब्बार इंगळगी यांची बँक ऑफ महाराष्ट्र खात्यावर पत पाहण्यासाठी ८,४५,००० रूपये ठेवण्यास सागितले. त्यानुसार इंगळगी यांनी, ती रक्कम ही बँक ऑफ महाराष्ट्र त्यांच्या खाते क्रमांकावर ठेवली. त्यानंतर फिर्यादीने चेक क्रमांक २२१७६१ हा चेक A.P.parcel services LTD रक्कम ३७० रूपये ही २१ नोव्हेंबर रोजी सागर आनंद जाधव याने सांगितल्याप्रमाणे फिर्यादीने क्रॉस चेक दिले. त्यानंतर जाधव याने त्या क्रॉस चेक सारखेच दुसरे बनावट चेक तयार करून त्यावर ८,४५,०००/- रू अशी रक्कम नमूद करून तो चेक सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा क्र. १३४ जमा करून रूबी सर्व्हिसेसच्या नावाने ८,४५,०००/- रू ट्रान्सफर करून घेऊन जब्बार इंगळगी यांची आर्थिक फसवणुक केली. 

आपली आर्थिक फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच, जब्बार इमामसाहेब इंगळगी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन, शुक्रवारी दुपारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार सागर आनंद जाधव रा-मिरज,ए. पी. सव्हिसेस रजी. ऑफिस, विजया हाईट समर्थ नगर मिरज आणि रूबी सर्व्हिसेस, सातारा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.  दुपोनि शिंदे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.