सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस ठाण्यात कुणबी नोंदी तपासणीसाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आलीय. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, कुणबी नोंदी तपासणी मोहिमेसाठी कठोर परिश्रम घेत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी शोध मोहीम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर वळसंग पोलीस ठाण्यातही त्यांचे कार्यक्षेत्रातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले स्वतः त्यामध्ये गुंतलेले असून इतर पोलिसांची टीम बनवली आहे.
या मोहिमेत ए. एस.आय. धनसिंग राठोड, गोपनीय हवालदार अशोक पाटील, पो. कॉ. अंबादास दुधभाते, पो. ना. अनिसा शेख, पो. कॉ. शाहीन तांबोळी, पो. कॉ.आकाश कलशेट्टी, पो.कॉ.प्रसाद मांढरे यांची शोध मोहिमेसाठी नेमणूक करण्यात आली आहे.
वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३६ गावांमधील गोपनीय रजिस्टर, गाव वारी रजिस्टर, जुने गुन्हे, अभिलेखाची तपासणी युद्ध पातळीवर सुरू आहे. गोपनीय रजिस्टरसह गुन्हे अभिलेख तपासले जात आहेत, असेही सांगण्यात आले.