या अभियानांतर्गत रेशीम उद्योग नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
सोलापूर : रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी तसेच आगामी वर्षात तुती लागवड नाव नोंदणी करण्यासाठी २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. रेशीम उद्योग नोंदणीसाठी रेशीम विकास अधिकारी श्रेणी-१, जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर मौजे हिरज, ता. उ.सोलापूर, तालूका कृषी अधिकारी कृषी विभाग व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना संपर्क साधावा असे आवाहन रेशीम विकास अधिकारी विनित पवार यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात ७२५ शेतकऱ्यांनी ८५५ एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केलेली असून यात वाढ होण्यासाठी महारेशीम अभियान च्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केली जाणार आहे. जिल्ह्यात उत्तरोत्तर तुती लागवडीत वाढ होत आहे.
वर्ष २०१७ पासून राबविल्या गेलेल्या महारेशीम अभियानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रेशीम उद्योगाची प्रचार व प्रसिध्दी होऊन रेशीम उद्योग लोकाभिमुख होणेसही मदत मिळाली आहे. त्यामुळे यंदासुध्दा महारेशीम अभियान आयोजित करण्यात आले असून यात प्रशासकीय यंत्रणेसोबतच कृषी क्षेत्रात असलेल्या कार्यरत यंत्रणा, जिल्हा परिषद यांच्यामार्फत व॒ रेशीम लागवडीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविणाऱ्या शेतकऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. शासन निर्णयानुसार मनरेगा योजना अंतर्गत एकरी ३,९७,३३५ रुपये व सिल्क समग्र-२ अंतर्गत एकरी ३,७५,००० रनपये अनुदान मिळणार आहे.
रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग कृषी व वनसंपत्तीवर आधारीत रोजगाराचे प्रचंड क्षमता असलेला रेशीम उद्योग असून महाराष्ट्रातील हवामान याला पोषक आहे. कृषी विकास दर वृध्दीबरोबरच ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिकस्तर व जिवनमान उंचविण्यास मदत करणारा हा उद्योग आहे.
यातून हमखास व नियमीत उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल ही वाढत चालला आहे. हीच बाब लक्षात घेऊन एकात्मीक व शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ ते २०२८ या वस्त्रोद्योग धोरण कालावधीत रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थ व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे हिरज येथे रेशीम कोष खरेदी, विक्री बाजारपेठ इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच कोष खरेदी बाजारपेठ कार्यान्वीत होणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.