संघर्षशील लोक नेते काळाच्या पडद्याआड; शनिवारी होतील अंत्यसंस्कार

shivrajya patra

अहमदनगर:  संघर्षशील नेता असा लौकिक असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ८७ वर्षीय ढाकणे हे निमोनियामुळे गेले तीन आठवड्यांपासून अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.  त्यात त्यांची प्रकृती खालावली. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस.एस.दीपक यांनी माध्यमांना दिली.

बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्लीला जाऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १९५१ मध्ये भेट घेतली होती. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन ठरले. गोवामुक्ती सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तसेच पाथर्डी तालुक्यातील विकासाबाबत विधानसभेत जाऊन पत्रके भिरकावली होती. 

बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले.  पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा यशाचा टप्पा राहिला.  महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्राम विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते ऊर्जा राज्यमंत्री होते.  

जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काँग्रेस, शेतकरी विचार दल व राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांमध्ये त्यांनी काम केले. ऊस तोडणी कामगार, शेतकरी, बेरोजगारी अशा विविध विषयांना त्यांनी हात घातला.

 उद्या होतील अंत्यसंस्कार

दिवंगत बबनराव ढाकणे यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये शुक्रवारी दुपारी एक ते उद्या दुपारी एक पर्यंत ठेवण्यात येणार आहे.  त्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आलंय.

... यांचा लाभला सहवास 

दिवंगत ढाकणे यांचा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. पी. सिंग अशा मोठ्या नेत्यांचा सहवास त्यांना लाभला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळाही त्यांनी पाथर्डीत उभा केला. दिवंगत ढाकणे यांच्या मागे मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे


संपूर्ण आयुष्य लोक सेवेसाठी खर्ची

शेतकरी, बेरोजगार आणि ऊसतोड कामगारांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे लढवय्ये नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. जनता पक्षात राजारामबापू पाटील यांचे ते जवळचे सहकारी होते. पाथर्डी तालुक्यातील अकोले सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांनी घेतलेली झेप म्हणजे त्यांच्या कार्य कर्तृत्वाची पोचपावती आहे. त्यांनी आपल्या तालुक्याला पोटच्या लेकराप्रमाणे जपले. संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी अर्पण केले. आम्हा सर्वांना प्रेरणा देणारे संघर्षशील नेते बबनराव ढाकणे यांना माझ्या पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील श्रध्दांजली अर्पित केलीय.
To Top