मणप्पुरम फायनान्समधील अपहार प्रकरणात ०१ कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

shivrajya patra
सोलापूर : येथील मणप्पुरम फायनान्समधील अपहार करण्यात आलेले सोन्याचे दागिन्यासह ०१ कोटी ५१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखेची कामगिरीत आरोपितांकडून हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्यात खबऱ्यांचं सहकार्य तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे कौशल्याने शोध घेत, एका आरोपीस सोलापुरातून आणि अन्य दोघांना कर्नाटकातील यादगीर येथून अटक करण्यात आली. पंचप्पा काळे, व लक्ष्मीकांत यतीराज बिहाणी व अश्विनी यतीराज बिहाणी अशी आरोपींची नांवे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मणप्पुरम फायनान्स कंपनी, लक्ष्मी मार्केट शाखेचे शाखाधिकारी सौ. वृषाली विनित हुंडेकरी यांनी पदाचा गैरवापर करीत ०३, २८, १२,८९२ रुपये किंमतीचे ०५ किलो ९७४ ग्रॅम सोने तारण ठेवून घेऊन, त्यासाठी सुमारे ८१ बनावट कर्ज प्रकरणे केली. 

त्या कर्ज प्रकरणासाठी एकुण ०२, ३४, ५२, ३९६ रुपये इतकी रक्कम नमूद शाखेतून कर्जदारांना दिली, असे भासवून, त्या रक्कमेचा वापर स्वत:चे फायद्यासाठी केला आहे, अशा आशयाची फिर्याद मणप्पुरम फायनान्सचे एरिया हेड प्रविण बाबुराव वरवटे यांनी २८ सप्टेंबर २०२३ रोजी दाखल केली.

त्यानुसार फायनान्स कंपनीची शाखा प्रमुख वृषाली विनीत हुंडेकरी व इतर यांचेविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भादंविसंक ४०८, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७ (अ), ४२०, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा, मणप्पुरम फायनान्स कंपनीचे फसवणुकीचा व गुंतागुंतीचा असल्याने, तो उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यासंबंधी पोलीस आयुक्त, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे (सोलापुर शहर), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सपोनि विजय पाटील यांनी तपास सुरू केला.

सपोनि विजय पाटील, पोसई अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने, मणप्पुरम फायनान्स कंपनीचे लक्ष्मी मार्केट शाखा येथील शाखा अधिकारी सौ. वृषाली विनीत हुंडेकरी यांना सोलापुरात येथून अटक केली. त्यांचेकडे सखोल तपास केला असता, त्यांनी मणप्पुरम फायनान्स लिमीटेड, लक्ष्मी मार्केट शाखा, सोलापूर येथे शाखा अधिकारी म्हणून काम करीत असताना, आपल्या पदाचा गैरवापर करुन, खाजगी इसम व गुन्ह्यातील आरोपी लक्ष्मीकांत यतीराज बिहाणी, अश्विनी यतीराज बिहाणी आणि पंचप्पा अर्जुन काळे यांचेकडून, सोने मणप्पुरम फायनान्स कंपनीत ठेऊन, त्या सोन्याचे बदल्यात, तिघांशी संगणमत करुन, इतर व्यक्तींची नावे, बनावट सोने तारण कर्जे तयार केली. 

त्यानंतर, त्या सोने तारण कर्जाची एकूण रक्कम ०२, ३४, ५२,३९६ रुपये ही, वृषाली हुंडेकरी व ०३ आरोपींनी आपसात संगनमताने वाटून घेतली. कटाचा भाग म्हणून, फायनान्स कंपनीत ठेवून घेतलेले सोने आरोपी पंचप्पा काळे यांना परत केले.

आर्थिक क्षेत्रात खळबळ माजवून दिलेल्या गुन्ह्यात पंचप्पा अर्जुन काळे (वय- ५१ वर्ष, रा. प्लॉट नं. १०, बापुजी नगर, शांती नगर जवळ, मजरेवाडी) लक्ष्मीकांत यतीराज बिहाणी, (वय- ३७ वर्ष) आणि अश्विनी यतीराज बिहाणी (वय- ४७ वर्ष, रा. १३१५, उत्तर कसबा, हल्ली रा. ३२, राधाकृष्ण कॉलनी, वसंत विहार, स्पर्श हॉस्पीटल समोर, सोलापूर) यांना गजाआड करण्यात आले आहे.

To Top