सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनसंपर्कावर भर दिला जात आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात जनस्वराज रॅली च्या माध्यमातून गुरुवारी, ०५ ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथून प्रारंभ होणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे यांनी दिली.
जनस्वराज्य रॅलीचे नियोजन आणि विचार विनिमयासाठी शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी येथील शासकीय विश्रामधामात राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग पातळीवरील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत मंगळवेढा येथून प्रारंभ होत असलेल्या जनस्वराज्य रॅलीचे नियोजन आणि मार्गावरील गावांशी संपर्क आणि ग्रामस्थांशी संवाद आदी विषयावर चर्चा होऊन शुक्रवारी, ०६ ऑक्टोबर रोजी अक्कलकोट येथे जन स्वराज्य रॅलीचा समारोप भव्य जाहीर सभेने होणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीस रासप प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सोमा मोटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. संजय माने-पाटील, अनुसूचित जाती जमाती आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गणेश लोंढे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल बंडगर, विद्यार्थी आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पंकज देवकते, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीमंत हाके, सोलापूर शहराध्यक्ष सतिश बुजुर्के, युवक शहराध्यक्ष नागेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.