कोणीही नेता-अभिनेता गर्दी जमवण्यासाठी तरुणांना आकर्षित करण्यासाठी म्हणतो, युवा शक्ती ! युवा शक्तीला राजकारणात स्थान दिले पाहिजे, युवा शक्तीला समाजात मान दिला पाहिजे, युवा शक्ती देशाचा उद्धार करू शकते.पण करतात उलटेच, हे मात्र युवकांना कळतच नाही.कदाचित ते कळण्याइतकी आकलनशक्ती नाही, शुद्धीवर तर असले पाहिजे.
तरुणांना आजचा प्रश्न भेडसावतो. नोकरी, काम-धंदा, रोजी -रोटी, शेती परवडत नाही. व्यापारात अनुभव नाही,आणि शिकून नोकरी नाही. म्हणून खेड्यातील, शहरातील युवक सैरभैर झालेला आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढले. शिक्षण करतांना युवक आणि आई-बाप मनात मांडे मांडतात. माझा मुलगा शिकेल,नोकरी लागेल.आपली परिस्थिती बदलेल. आता त्या स्पर्धेत मुलीसुद्धा उतरल्या आहेत. शिक्षणात सवलत, प्रवासात सवलत दिल्यामुळे जितकी मुले, तितक्याच मुली शाळा कॉलेजमध्ये जाऊ लागल्या आहेत. सर्वच युवकांचे लक्ष्य आहे नोकरी ! पण नोकरीचे चक्रे उलटी फिरत आहेत.
सरकार नोकरांची संख्या कमी करीत आहे. आहे ती कैडर संख्या कमी करणे, रिक्त जागांवर रिटायर नोकर नेमणे, मक्तेदारांकडून काम करून घेणे, यामुळे युवकांना नोकरीची संधी कमी झाली आहे. बांधकाम, शिक्षण, आरोग्य, वीज, परिवहन यात तर मक्तेदारीवर कामे होतात, पण आता मुख्य प्रशासन महसूल आणि पोलिससुद्धा मक्तेदारीवर सुरू झाले आहेत.
आताच जळगाव जिल्ह्यातील कलेक्टरने जाहिरात काढली कि, रिटायर तहसीलदारांना तीन-तीन महिन्यांसाठी कामावर घेत आहोत, हे तर अति झाले. हे काही कलेक्टरने केलेले धाडस नाही. हे आहे सरकारचे आखलेले धोरण ! हे जर यशस्वी ठरले तर पुढील पंचवार्षिकमध्ये कलेक्टर, एसपी, न्यायाधीशसुद्धा मक्तेदारीने चार-सहा महिन्यासाठी भाड्याने घेतले जातील.ते सुद्धा मक्तेदाराकडून पाहिजे, तेंव्हा वापरले जातील.
सरकार कोणत्या दिशेने जात आहे ? ही दिशा आहे, इस्ट इंडिया कंपनीची... राजे महाराजांनो, तुम्ही कशाला फौज ठेवता ? आमची तैनाती फौज भाड्याने घ्या, पुढे हेच धोरण इंग्लंड च्या राणीने वापरले. लार्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल नेमून भारतीय राजे महाराजांना तैनाती फौज भाड्याने दिली. राजांनी, संस्थानिकांनी स्वतःचे सैन्य बरखास्त केले. या संधीचा फायदा घेत इंग्रजांनी एक एक संस्थाने बरखास्त केली. देश पूर्ण पारतंत्र्याखाली गेला.
सरकारी संस्थांचे खाजगीकरण तर करायचे आहे. या संस्था कंपनीला विकून पैसा कमवायचा आहे. हे तरूणांच्या लक्षात येऊ नये, म्हणून याच तरूणांना पुर्ण ३६५ दिवस व्यस्त करून ठेवण्यासाठी सरकार उपक्रम राबवत आहेत. परवा शहिद दिन साजरा केला. काल शौर्य दिवस साजरा केला.
रविवारी, ०१ ऑक्टोबर रोजी स्वच्छता दिवस साजरा करीत आहोत. घरून कचरा न्या... स्वच्छ जागेवर टाका... फोटो शुटींग घ्या ! उचलतांना, सफाई करतांना व्हिडिओ घ्या. व्हायरल करा.पेपरला फोटो छापून येईल. तो पहा आणि मश्गूल राहा. हे जवानांना, तरूणांना, नागरिकांना गुमराह करण्याचे धोरण आहे.
शिवजयंती, गणपती, नवरात्री अशा जयंती साजऱ्या करा. आमदार-खासदारांकडून देणगी देऊन ढोल-लेझीम नाच-गाणे दारू, अफू-गांजा, चरस नशा करा. या शिवजयंतीला जळगाव कोर्टसमोर चारशे तरूण धुंद होऊन नाचत होते. तब्बल आठ तास. कोणी पुरवली नशा ? कोणी पुरवला पैसा ? सरकारने आमदार-खासदारांना दिला... आमदार-खासदारांनी शिवजयंती व गणपती मंडळांना दिला. तब्बल एक कोटी. पैसा ही आपलाच. दारूची दुकाने ही आपलीच. घ्या,प्या... बेधुंद होऊन नाचा. सरकारचे मिशन सक्सेस.
तरूणांना हे कळतच नाही. कळू द्यायचे, ही नाही, म्हणून कोणताही शो करतांना सरकार पैसा पुरवते. तरुण खातात पितात. धुंद-बेधुंद होतात, तोपर्यंत सरकार आपले इप्सित साध्य करते.
देश गेला खड्ड्यात,शो मस्ट गो ऑन!
"अरे ओ सांभा, होली कब है रे ? "
"सरकार ! पहले नवरात्री, बादमे होली ."
"तो, पुरे नऊ दिन रामगढ चूर होना चाहिए."
@ शिवराम पाटील,
महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव.
९२७०९६३१२२