०५ शेतकऱ्यांकडून उचल घेऊन पसार झालेला सालगाडी गजाआड
सोलापूर : शेतावर सालगडी म्हणून चाकरीस राहतो असे म्हणून शेतकऱ्यांकडून उचल रक्कम घेऊन पसार झालेल्या सुरेश धोडिंबा खंदारे (वय-३८ वर्षे) याचा शोध घेऊन, त्यास गजाआड करण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आलं आहे. सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्याचा शोध घेऊन त्यास अटक केली.
प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात मजुराची आवश्यकता आहे का, मला शेतातील सर्व कामे जमतात, मी तुमच्याकडे सालगडी म्हणून तयार आहे, सध्या मी एका मालकाकडे कामास आहे त्यांचे माझ्याकडे ३६ हजार रुपये फिरतात तेवढीच रक्कम द्या, मी उद्या माझे सर्व सामान घेऊन येतो, असा विश्वास संपादन करून, तो शक्यतो रोख स्वरूपात रक्कम घ्यायचा. स्वतःची ओळख लपवून तो प्रत्येकाला महादेव रोकडे अशी नवी ओळख करून द्यायचा.
मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील रमेश शंभू शेळके यांच्या शेतात १८ ऑगस्ट २३ रोजी भेट घेऊन स्वतःची ओळख महादेव रोकडे अशी करून देत वरील वरील प्रमाणे थाप मारून ३६, ६०० रुपये घेतले. तत्पूर्वी विसरा म्हणून फोन पे वर ५०० रुपये इसार म्हणून घेतले. अशाच पद्धतीने 2021 पासून त्याने ५ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे पोलीस दफ्तरी नोंद आहे. त्याने या पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा हा उद्योग २०२१ पासून सुरू केला होता.
२०२१ मध्ये आनंद व्यंकटराव क्षीरसागर ( रा. स्नेह संकुल अपार्टमेंट, लक्ष्मी पेठ, सोलापूर) या शेतकऱ्यास त्याची फसवणूक करण्याच्या उद्देशाने महादेव रोकडे याने, त्यांच्याकडून ७० हजार रुपये घेऊन वरील पद्धतीने फसवणुकीचा प्रारंभ केला होता. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली.
त्यानंतर महादेव रोकडे याने हीच पद्धत अवलंबत, रमेश शेळके (कोन्हेरी, तालुका मोहोळ) यांची ३७, १०० रूपये, उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे तांडा येथील लालसिंग विठ्ठल जाधव यांची ३६, ५०० रूपये, उस्मानाबाद जिल्हा, लोहारा तालुक्यातील दस्तापुर येथील पुरुषोत्तम नंद शर्मा यांची ३६, ६०० रूपये आणि मोहोळ तालुक्यातील विरवडे येथील शेतकरी उमेश वामन अवताडे यांची ४२, १०० रुपये घेऊन त्याने पाय काढता घेतला. या वर्षातील फसवणुकीच्या चारही घटनांची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात झाली.
संशयित आरोपी महादेव रोकडे असे नांव सांगून तो राहण्याचे ठिकाण व मोबाईल नंबर सतत बदलत असल्याने तो मिळून येत नव्हता. सदर बझार पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटिकरण पथकाने त्याच्या बदलत्या वास्त्यव्याचे बारकाईने अभ्यास करुन त्याचा मांजरी पुणे येथे जाऊन शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचे खरे नांव सुरेश धोडिंबा खंदारे (रा. चुंगी, तालुका अक्कलकोट) असे असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. त्यास सदर बझार पोलीस ठाणेकडील उपरोक्त नमूद गुन्ह्याचे तपासात अटक केली.
आरोपी सुरेश धोडिंबा खंदारे ऊर्फ महादेव रोकडे यास ताब्यात घेतल्याचे मिळालेल्या माहितीवरुन सर्व शेतकऱ्यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात येऊन सुरेश धोडिंबा खंदारे ऊर्फ महादेव रोकडे याच्याविरुध्द फिर्याद दाखल केली.
... यांनी पार पाडली कामगिरी
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग २) राजू मोरे यांचे मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पोपटराव धायतोंडे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि सचिन माळी, पोह औदुंबर आटोळे पोना सागर सरतापे, पोना अयाज बागलकोटे, पोकॉ सागर गुंड, पोकॉ सोमनाथ सुरवसे, पोकॉअर्जुन गायकवाड यांनी पार पाडली.