सोलापूर : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील (पार्क चौक) जवाहरलाल नेहरू वसतिगृह जिल्ह्यातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरीब,गरजू कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. शाळा कॉलेज सुरू होऊन दोन ते अडीच महिने उलटून गेले. अद्याप वसतिगृह सुरू झाले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते तात्काळ सुरु करण्यात यावं आणि या वसतिगृहाच्या खाजगीकरणाला युवासेनेचा तीव्र विरोध असल्याचे युवा सेना जिल्हाध्यक्ष सागर शितोळे यांनी सांगितले.
जवाहरलाल नेहरू वसतिगृहातील आजी-माजी विध्यार्थ्यांनी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनास, २८ जुलै रोजी पत्र देऊन एका आठवड्यात वसतिगृह सुरू करा, अशी विनंती केली होती. हे वसतिगृह चालू करावे, यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक राजकीय सामाजिक संघटनानी निवेदन देऊन आजवर वेळोवेळी प्रशासनास विनंती केली. तरी जिल्हा परिषद प्रशासनाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. वसतिगृह यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यासंबंधी आजतागायत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. आज पर्यंत आजही प्रवेश प्रक्रिया आणि वसतिगृह बंद आहे.
त्यातच वसतिगृहाचे खाजगीकरण होणार, वसतिगृहात पार्किंग सुरू होणार अशा नाना विविध गोष्टी वर्तमानपत्रात वाचायला मिळत आहेत. वसतिगृहाच्या खाजगीकरणास वस्तीगृहाच्या सर्व आजी/माजी विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे. वसतिगृह तात्काळ सुरू करण्याबरोबरच वसतिगृहाचे खाजगीकरण होऊ नये, ही युवासेनेची प्रमुख मागणी आहे.
आतापर्यंत विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले आहे. वसतिगृह तात्काळ सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे. या आठवडाअखेर जर वसतिगृह सुरू झाले नाही तर पुढील आठवड्यात संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या आधारे आम्ही युवासेनेच्या वतीने लोकशाही शांततेच्या मार्गाने कोणालाही कसलाही त्रास न होता आंदोलन व उपोषणाचा मार्ग निवडणार आहोत.
सदर वसतिगृह चालू करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आरोग्यमंत्री तानाजी सावंत व शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांची लागेल ती मदत घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ, असे युवासेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे यांनी म्हटले आहे.
ग्रामीण भागातील मुलांचे निदान इथून पुढचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या आठवड्यात तात्काळ वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खुले करावे, अशी युवासेनेची प्रमुख मागणी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे, उपशहरप्रमुख समर्थ मोटे, किशोर चव्हाण, युवासेना उपशहरप्रमुख पद्मसिंह शिंदे, प्रवीण माने, निलेश कुंभार, आकाश हंगरगी, यासिन शेख, शिवानंद बिराजदार, खंडेराव कोरे, सिद्धाराम हंगरगी उपस्थित होते.