सोलापूर : आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी सलगर वस्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही दुर्घटना उत्तर सोलापूर तालुक्यात डोणगांव-भाटेवाडी शिवारात रविवारी दुपारी घडली. त्यात गुरुजी म्हणून सेवेत असलेले इरण्णा बसप्पा जुजगार यांचा मृत्यू झाला होता, असं सांगण्यात आले.
सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांकडून या दुर्घटनेसंबंधी मिळालेली अधिक माहिती अशी की, अक्कलकोट रस्त्यावरील मल्लिकार्जुन नगर जवळील समर्थ नगरातील रहिवासी आणि गुरुजी इरण्णा बसप्पा जुजगार (वय-४१ वर्षे) यांनी नुकतीच नवी कार घेतली होती.
नविन गाडी घेतली, म्हणून त्याचे सासरच्या मंडळींना पेढे देण्यासाठी इरण्णा जुजगार त्यांच्या सासरी कारने गेले होते. वरील ठिकाणी आले असता, त्यांचे ताब्यातील चार चाकी वाहन (एम एच १३ /ई सी ६०६८) निष्काळजीपणाने चालविल्याने कार भाटेवाडी शिवारात आमले वस्तीजवळ एका खोल विहिरीत कोसळली. हा दुर्दैवी प्रकार त्यांची पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखत घडला.
कार सुमारे ८० फुट खोल विहीरीत कोसळल्याने, त्यात गुरुजी इरण्णा जुजगार जखमी होऊन पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोहेकॉ/१७१ दिपक रमेश वाल्मिकी यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार स्वतःच्या मृत्युस कारणीभूत झाल्याप्रकरणी इरण्णा जुजगार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मंद्रुपकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.