सोलापूर विद्यापीठात बुधवारपासून प्रजासत्ताक दिन संचालनासाठी राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिर

shivrajya patra
सोलापूर : 
राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे बुधवारी २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे राज्य व राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पूर्व संचलन राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिर होणार असल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली. 

या निवड चाचणी शिबिराचे उद्घाटन बुधवारी २७ सप्टेंबर . रोजी सकाळी साडेअकरा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे क्षेत्रीय संचालक श्री अजय शिंदे, राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे यांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

सन २०२३-२४ च्या पूर्व राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय प्रजासत्ताक दिन चाचणी व निवड शिबिर यंदाच्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार तीन दिवस निवड चाचणी शिबिर सोलापुरात होत आहे. 

यामध्ये राज्यातील विविध ५२ विद्यापीठातील ३३३ विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. यामध्ये ९९ मुले तर २३४ मुलींचा सहभाग आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे. या शिबिरातून मुंबई आणि दिल्लीत प्रजासत्ताक दिना दिवशी होणाऱ्या संचालनासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. 

बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे तीन दिवस वेगवेगळ्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.  धावणे, परेड प्रॅक्टिस, योगा, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा यात समावेश आहे. शुक्रवारी, २९ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता या शिबिराचा प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे क्षेत्रीय संचालक अजय शिंदे, राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे यांची उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी दिली.
To Top