दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मंद्रुप येथील वेदमूर्ती,ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद इरय्या हिरेमठ यांचं अल्पशः आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 74 वर्षे होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मंदुपसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
शिवानंद हिरेमठ हे समाजकारण आणि राजकारण क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत होते. ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठविला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व महात्मा बसवेश्वर स्मारक, मंगळवेढा जिल्हा कार्याध्यक्ष असताना केलेल्या विविध कामगिरी आणि समाजहितासाठी केलेल्या त्यांच्या कार्यामुळे त्यांना परिसरात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
मंदुप येथील शिवयोगेश्वर हिरेमठ मठाचे संस्थापक अध्यक्ष होते, तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य होते. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याचे काम केले. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांचा शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभाव सर्वांच्या परिचयाचा होता.
गावातील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. कोणत्याही व्यक्तीला अडचण आल्यास मदतीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने समाजातील एक कर्तव्यदक्ष, सेवाभावी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनामुळे हिरेमठ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.
शिवानंद हिरेमठ यांच्या निधनाने मंदुप गावाने एक ज्येष्ठ मार्गदर्शक, समाजहिताची जाणीव असलेला कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांचा आधारवड गमावला आहे. त्यांच्या कार्याची आठवण आणि समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
*** शब्दभार : गिरमल्ला गुरव.
