डॉल्बी सिस्टीम वापरावर बंदी...! पोलीस आयुक्तालय हद्दीत बंदीचा आदेश जारी

shivrajya patra

सोलापूर/24 : मोहरम उत्सव तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सोलापूर शहरात निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीमच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163(1) अन्वये हा आदेश लागू करण्यात आला आहे.

बुधवारी,17 ते 26 जून या दरम्यान मोहरम उत्सव साजरा होत आहे, शुक्रवारी, 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. 

या कालावधीत विविध ठिकाणी मिरवणुकांचे आयोजन केले जाते. मिरवणुकांदरम्यान उत्सव मंडळांकडून डॉल्बी सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

गतकाळातील अनुभवाच्या आधारे डॉल्बी सिस्टीममुळे नागरिकांना कानाचे, छातीचे त्रास होणे, तसेच गंभीर शारीरिक दुष्परिणाम होऊन जिवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली आहेत. याबाबत सोलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे निवेदने सादर करून डॉल्बी सिस्टीमवर बंदीची मागणी केली होती.

पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, बुधवारी, 24 ते 26 जून रोजी मध्यरात्री 24.00 वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालय हद्दीतील मोहरम व राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित सर्व मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोणत्याही व्यक्तीने किंवा आयोजकांनी डॉल्बी सिस्टीमचा वापर करू नये, असं सूचित करण्यात आलं आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये बुधवारी, 24 ते 26 जून रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मोहरम उत्सव व राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती मंडळांकडून आयोजीत मिरवणुकीत/सार्वजनिक कार्यक्रमात, कोणत्याही व्यक्ती किंवा कार्यक्रम आयोजकांनी प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरणेस/उपयोगात आणण्यास भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 प्रमाणे वापरास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे आदेश पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी जारी केले आहेत.

*****

To Top