सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरी-जबरी चोरी, महिला अत्याचार, घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण, खंडणी वसुली, पाकिटमारी आणि महिलांच्या गळ्यातील सौभाग्य अलंकाराची चोरी अशा एक ना अनेक गुन्ह्याची नोंद असलेल्या एका महिलेसह चौघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून ०२ वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय. दिपक मोहन जाधव, सचिन कलप्पा व्हनमाने, कपील ज्ञानेश्वर भांडेकर आणि फरजाना अब्बास शेख अशी त्यांची नांवे असल्याचं सांगण्यात आलंय.
महिला अत्याचाराचे गुन्हे करणे, जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या दिपक जाधव (वय-२५ वर्षे, रा. सेटलमेंट फ्रि. कॉलनी नं. ०२ मैदानजवळ, सलगर वस्ती) याच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाणेकडून तर जुळे सोलापूर कल्याण नगरातील रहिवासी २७ वर्षीय सचिन व्हनमाने याच्याविरुध्द घरफोडी करणे, घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून त्याच्याविरुध्द तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
सामान्य नागरीकांना मारहाण करुन दहशत निर्माण करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या ३. कपील भांडेकर (वय-२७ वर्षे, रा. घर नं. ३०, वडार गल्ली, बुधवार पेठ, सोलापूर) याच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून तर गोदुताई विडी घरकुलातील फरजाना शेख (वय-४२ वर्षे) हिच्याविरुध्द महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे, सामान्य नागरीकांचे पाकीट चोरणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने तिच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या सर्व प्रस्तावावर पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन एका महिलेसह चौघांना सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार केलं आहे.