सोलापूर : सुमारे दीड वर्षांपूर्वी ग्रामसभेमध्ये कासेगांवात संपूर्ण दारूबंदीचा ठराव संमत करण्यात आला. या ठरावावर सकारात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडं सातत्यानं पाठपुरावा करूनही परिणाम शून्य दिसून येत आहे. सरपंच यशपाल वाडकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन संपूर्ण दारूबंदीच्या मागणीचं निवेदन दिले..jpeg)
बुधवारी, 07 मे रोजी गृहराज्य मंत्री योगेश कदम त्यांच्या नियोजीत कार्यक्रमासाठी सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात शिवसेना जिल्हाध्यक्ष मनिष काळजे यांचे संपर्क कार्यालय ' सेवालय ' इथं कासेगांव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव इथं अवैध दारू विक्री संपूर्ण गावाची प्रमुख समस्या बनलीय. गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विषारी रसायनयुक्त दारूमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे. अनेक लोक या विषारी दारूचे ' बळी ' ठरले आहेत.
कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या व्यसनाधीनतेमुळे घरातील महिलांना-मुलांना प्रचंड आर्थिक, मानसिक, सामाजिक तणावाचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत परिवर्तन आणण्याच्या मुद्यावर बोलाविलेल्या ग्रामसभेत गावातील महिलांनी वज्रमूठ आवळून संपूर्ण दारूबंदी चा ठराव घेतला होता. त्या ठरावावर परिणामकारक कारवाईसाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडं पाठपुरावा करूनही गावचं चित्र बदललेलं नाही.
ही परिस्थिती बदलण्यासाठी गृह राज्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून कासेगावमध्ये लवकरात लवकर संपूर्ण दारूबंदी करावी. त्यासाठी पोलीस प्रशासनास योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंती या निवेदनाद्वारे सरपंच यशपाल वाडकर, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावच्या महिलांनी केली.
यावेळी उपस्थित गावातील महिलांनी गृह राज्य मंत्री योगेश कदम यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. त्यावेळी मंत्री कदम यांनी त्या निवेदनाची दखल घेत भ्रमणध्वनीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सपर्क करून या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना करताना, अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यास सांगितले. 
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे,जिल्हाप्रमुख मनीष काळजे हेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी देखील यासंदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कासेगांवचे लोकनियुक्त सरपंच यशपाल वाडकर, राजाराम पाटोळे, ताजुद्दीन शेख, सौ. तनुजा मुळे, प्रकाश हेडे, संभाजी चौगुले, जालिंदर गायकवाड, भरत जाधव, सौ. अनिता हेडे, सौ. सोनाली वाडकर, सौ. जाधव, सौ. तांबटकरी आदी उपस्थित होते. 
यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सौ. भाग्यश्री जाधव यांनाही या निवेदनाची प्रत देऊन अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय.
