वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ चे उद्घाटन
मुंबई : महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात वेव्हज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते.
मुंबईतील चित्रपटनगरीत मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ५०० एकरमध्ये असलेल्या मुंबईतील चित्रपटनगरीत अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी खास १२० एकरमध्ये मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प आगामी काही महिन्यांत प्रत्यक्षात येणार आहेत.
या वेव्हज परिषदेद्वारे भारताने क्रिएटिव्ह क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दाखविले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक महासत्ता म्हणून ओळख निर्माण केली असून, आता भारत क्रिएटिव्ह क्षेत्रातही नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. माहिती तंत्रज्ञान, कौशल्य आणि क्षमता ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भारताच्या नव्या ‘क्रिएटिव्ह वेव्हज'चे स्वागत करण्याचे आवाहन केले.
***
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विविध देशांतील गुंतवणूकदारांशी संवाद
सृजन क्षेत्रातील ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती
· सृजन क्षेत्राच्या विकासासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. १ : मुंबईमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध देशांमधील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला.
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमधील लोटस बॉलरूममध्ये विविध देशातील प्रतिनिधींची गोलमेज बैठक झाली. यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी यांनी उपस्थित उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, केंद्रीय सचिव संजय जाजू तसेच उद्योजक ॲडम ग्रॅनिटी, ॲडम मोसरी, आदर पुनावाला, अजय बिजली, अक्षत राठी, अक्षय विधानी, भूषण कुमार, चांघाम किम, चार्ली जेफरी, डायन स्मिथ गंडर, एकता कपूर, प्रिन्स फैजल बिन बंदर बिन सुलतान अल सौद, सुबासकरण अलीराजाह, शूजी उत्सुमी, शरद देवराजन, शंतनू नारायण, संकेत शाह, संजीव गोयंका, राल्फ सिमोन, राजन नवानी, पिरोजशा गोदरेज, नितीश मिटरसेन, अलेक्झांडर झरोव, क्रिस रिप्लेय, दिनेश विजन, लिझवेटा ब्रॉडस्काया, हर्ष जैन, फरहान अख्तर, हार्वेय मासोन, हिरोकी टोटोकी, जोंग बम पार्क, लुईस बॉसवेल, महेश सामत, मार्क रीड, नमीत मल्होत्रा, निल मोहन उपस्थित होते.
भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असणार आहे. कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर यावर आधारित ऑरेंज इकॉनॉमी पुढील १० वर्षांत दुप्पट होणार आहे. या इकॉनॉमीला आणखी गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
भारताने सृजन क्षेत्राच्या विकासासाठी उचलेले पाऊल अत्यंत सकारात्मक असून त्यास सर्व उद्योजक उत्स्फूर्तपणे साथ देतील, असा विश्वास सर्व उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केला.
***
