सोलापूर : मद्याचे घोट रिचवीत असताना, दोन मित्रात झालेल्या भांडणाचं पर्यवसान तरुणाला दगडाने ठेचून हत्येत झालं. ही घटना देगांव परिसरात घुंगे यांच्या रत्नाई शिवार प्लॉटींगमध्ये लिंबाच्या झाडाखाली, 06 मे रोजी सायंकाळी 07 च्या सुमारास घडली. दुर्गप्पा ऊर्फ रमेश भिमय्या पवार (वय- ४२ वर्षे) असं मृताचं नांव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात सलगर वस्ती पोलीसांनी आरोपी मुस्सा ऊर्फ मुन्ना अब्दुली शेख याला गजाआड केलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शेजारच्या गुलबर्गा जिल्ह्यातील खणदाळ येथील रहिवासी दुर्गप्पा ऊर्फ रमेश भिमय्या पवार त्याचा मित्र मुस्सा ऊर्फ मुन्ना अब्दुली शेख (रिंग रोड, सिध्देश्वर मठाजवळ, गुलबर्गा) घुंगे यांच्या रत्नाई शिवार प्लॉटींगमध्ये असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली दारू पित बसले होते.
दरम्यान त्यांच्यात अज्ञात कारणावरून बाचाबाची झाली, त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं. त्यात मुस्सा याने दुर्गप्पा याचं डोके लिंबाच्या झाडावर आपटले, त्यात तो खाली पडला असता, त्याने दुर्गप्पाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तेथे पडलेल्या दगडाने त्याच्या डोक्यात मारले, तेव्हा त्याच्या डोक्यातून अति रक्तस्त्राव होऊन तो बेशुध्द झाला.
मुस्साने बेशुध्द अवस्थेतील दुर्गप्पाला तेथे पडलेल्या बॅनरमध्ये गुंडाळून ठेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. त्यातच दुर्गप्पाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताची पत्नी लक्ष्मी हिने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार मुस्सा ऊर्फ मुन्ना अब्दुली शेख याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात आरोपीस गजाआड करण्यात आलंय. पोलीस उपनिरीक्षक कुतवळ या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
