Type Here to Get Search Results !

स्त्री-पुरुष सहजीवन आनंदी होण्यासाठी...स्त्री चळवळ : डॉ. गीताली

मोहोळ : चांगला माणूस होण्यासाठी व पुरुषसत्ताक व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टी बदलण्यासाठी स्त्री- चळवळ महत्त्वाचे आहे. स्त्री-चळवळ,स्त्रीमुक्ती पुरुष विरोधी नसून स्त्री- पुरुष सहजीवन आनंदी होण्यासाठी स्त्री चळवळ महत्त्वाची भूमिका बजावत आहे,असे प्रतिपादन "मिळून साऱ्याजणी" या मासिकाच्या संपादिका डॉ. गीताली वि. मं. (पुणे) यांनी, सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या ३४व्या वर्धापन दिन व मकर संक्रांतीनिमित्त आयोजित " निमित्त संक्रांतीचे-वाण विचारांचे " या कार्यक्रमात "स्त्री- स्वभान व नाती" या विषयांवर व्याख्यान देताना केले.

प्रथम सावित्रीमाई फुले व संस्थेचे संस्थापक शाहीर विश्वासराव फाटे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. अतिथी-मान्यवरांच्या स्वागतानंतर, दहा कोटींच्या ठेवी असलेल्या या महिला पतसंस्थेच्या मा. चेअर पर्सन संगीता नंदकुमार फाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय पतसंस्थेच्या संचालिका ॲड. प्रांजली सागर फाटे यांनी केले.

महिला आदिशक्तीचे रूप होती, कुलस्वामिनी (कूळ-परिवारा) ची प्रमुख होती, ती सर्वांचा सांभाळ करायची, परंतु आता स्त्री मागे पडली आहे. देश पुढे जायचा असेल तर स्त्रीला आत्मभान येणे व स्त्री विकसित होणे गरजेचे आहे, असे मत मोहोळच्या कवयित्री डॉ. स्मिता प्रमोद पाटील यांनी मांडले.

महिला पतसंस्थेचे सल्लागार-मार्गदर्शक व मोहोळ अर्बन बँकेचे संस्थापक नंदकुमार विश्वासराव फाटे आपले मनोगत-अनुभव व्यक्त करताना म्हणाले, "मिळून साऱ्याजणी "या मासिकाचा मी गेल्या ४० वर्षापासून वर्गणीदार-वाचक आहे. ते फक्त महिलांचे मासिक नसून पुरुषांनीही ते वाचायला हवे."मिळून साऱ्या जणीं" परिवाराच्या संस्थापक कै. विद्या बाळ यांच्या मासिक व पुस्तक रुपी मार्गदर्शनामुळे आपल्या वैवाहिक-सामाजिक जीवनात कसे पराकोटीचे, सकारात्मक बदल झाले, हे त्यांनी तपशीलवार सांगितले. 

त्या संदर्भात विद्या बाळ यांच्या प्रति आपली अपार कृतज्ञता व्यक्त करताना व हृदयस्पर्शी आठवणी सांगताना नानांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रुधारा वाहू लागल्या. ते पाहून उपस्थित महिलांही स्तब्ध झाल्या व त्यांनाही गहिवरून आले होते.

ए. पी. आय. व मोहोळ तालुका दामिनी (स्त्री संरक्षक) पथक प्रमुख अंजना फाळके यांनी आपले विचार मांडताना म्हणाल्या, कुटुंबामध्ये मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत. मोबाईल-टिव्ही चा  योग्य वापर करायला हवा. मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण आपल्या मोहोळ तालुक्यातही वाढत आहे. पालकांनी स्वतःच्या कामाचा कितीही व्याप असला तरी मुलांच्या योग्य वाढी संदर्भात अधिक काळजी घ्यायला हवी. कारण कायदे मुलींच्या बाजूने आहेत. तरुण मुले, युवक क्षणिक मोहामुळे गुन्ह्यांच्या कठीण कलमात अडकतात व पुढे आयुष्यभर मुलांना सरकारी-निमसरकारी कामे करता येत नाहीत. कारण आता बऱ्याच ठिकाणी पोलीस स्टेशनचा वर्तणूक व गुन्हे नसल्याचा दाखला सक्तीने मागितला जातो. अशी कायद्यातील पालकांना अतिशय उपयुक्त व अचूक माहिती एपीआय फाळके यांना आपल्या पोलीस सेवेतील अनुभवावरून दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉ.स्वाती जयंत गोळवलकर म्हणाल्या, स्त्रिया स्वतःच्या समस्याग्रस्त आयुष्याच्या अनुभवामुळे मुलींचा जन्म नाकारण्यामध्ये पुढे आहेत. त्यामुळे मुलगा-मुलगी समान मानायची मानसिकता करायला हवी. कुटुंबामध्ये उच्च शिक्षण घेऊन आलेल्या सुनेला, एवढी शिकलेली आहे हिला आता घरातील आम्ही काय शिकविणार ? असे टोमणे न देता सुनेच्या शिक्षणाचा कुटुंबाच्या प्रगतीसाठी उपयोग करायला हवा. सर्वच नात्यांना आपण स्वतःहून प्रेम दिल्याने ते प्रेम आपल्याला त्यांच्याकडून परत मिळणार असते. यासाठी नाती जपायला हवीत, असे आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचे बोल त्यांनी सांगितले.

शालेय राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत नागनाथ विद्यालय व ज्यु. कॉलेज मोहोळ येथील खेळाडू १७  व १९ वर्षे मुली गट यांचा अनुक्रमे महाराष्ट्रात तिसरा व दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल संस्थेच्या वतीने दोन्ही विजेत्या संघाला ट्रॉफी, गिफ्ट, सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. घरोघरी हळदी- कुंकवाचा मोठा सण असूनही ३०० महिला, तरुणी व पुरुष उपस्थित होते. सर्वच भाषणांच्या वेळी पिनड्रॉप सायलेन्स, तर कांही वाक्याला नैसर्गिकरित्या टाळ्या व हास्य असा दुर्मिळ प्रतिसाद महिलांमधून मिळत होता.

यावेळी प्रमुख पाहुण्या पूर्वा भिंगे( पुणे ), विजयश्री सुधीर गायकवाड, भाग्यश्री रणजीत फाटे, अनिता भालचंद्र जाधव, संजीवनी यशवंत गुंड, सविता मुकुंद गादेकर-गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल मालती निलेश देशमुख, महानंदा शरद आंडगे, माजी सभापती रजनी अशोक कांबळे आदी महिला तसेच सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या चेअर पर्सन ॲड. शमशाद मुकबुल मुलाणी, संचालिका भारती भारत बरे, कीर्ती शिवराज शिंदे, सुरेखा अरुण ननवरे, भाग्यश्री गिरीश चव्हाण, अरुणा राजशेखर घोंगडे, तसेच चंद्रकांत (बापू )फाटे, निवृत्ती शिंदे, गोटणे गुरुजी, अरुण ननवरे सर, अशोक भोसले, जहिरुद्दिन पठाण सर, समीर सर, आबा गावडे सर आदी मान्यवर, बहुसंख्य महिला वर्ग, मोहोळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष  नसीर मोमीन, संजय आठवले, अण्णा कांबळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संध्या आकाश फाटे व संस्थेचे व्यवस्थापक सिकंदर मुजावर यांनी केले तर संस्थेच्या संचालिका रेखा सूर्यकांत कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेचे कर्मचारी प्रवीण शिंदे,अनुराधा भालेकर,मनीषा हेळकर तसेच मोहोळ अर्बन बँकेचे व्यवस्थापक सुदर्शन शिंदे,नितीन शिंदे,आमिन आतार, वैशाली चव्हाण,आकाश शिंदे,खेलु वाघमोडे आदींनी परिश्रम घेतले .