सोलापूर : केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी आठवी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे. सन 2025-26 मध्ये घेण्यात येणाऱ्या आठवी आर्थिक गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व कामाच्या सनियंत्रण व समन्वयासाठी महानगर पालिका क्षेत्रातील समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या गणनेमध्ये आर्थिक कार्यात गुंतलेल्या सर्व उद्योग व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी कुटुंबास, उद्योगास भेट देऊन करण्यात येणार आहे. राज्याच्या भौगोलिक सीमांतर्गत कुटुंबांच्या निवासी जागेत, कुटुंबाच्या निवासाबाहेर निश्चित संरचना असलेले अथवा नसलेले घरगुती उपक्रम तसेच सार्वजनिक व खाजगी आस्थापनांची माहिती प्राप्त करून घेणे, हा आर्थिक गणनेचा प्रमुख उद्देश आहे.
आर्थिक गणनेद्वारे उपलब्ध होणारी माहिती राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय उत्पन्न व राज्य स्तरावरून राज्य उत्पन्न यासंदर्भातील अंदाज तसेच राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही अधिक अचूकपणे तयार करण्यासाठी उपयुक्त होणार आहे. तसेच ही माहिती जिल्हा व राज्य स्तरावर सामाजिक व आर्थिक व्यवस्थापन तसेच नियोजन यांच्यासाठी उपयोगी येणार आहे. त्या अनुषंगाने, या गणनेच्या कालबध्द अंमलबजावणीसाठी तसेच क्षेत्र कामाचे प्रभावी सनियंत्रण व समन्वयासाठी विविध स्तरावर शासनाकडून समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
महानगरपालिका आयुक्त तथा महानगरपालिका प्रभारी अधिकारी-अध्यक्ष, अपर आयुक्त, महानगरपालिका सदस्य, उपायुक्त (प्रशासन) महानगरपालिका-सदस्य, आरोग्य अधिकारी महानगरपालिका–सदस्य, शिक्षणाधिकारी महानगरपालिका-सदस्य, जिल्हा उद्योग केंद्र, महाव्यवस्थापक-सदस्य, जिल्हा माहिती अधिकारी -सदस्य बालविकास प्रकल्प अधिकारी (नोडल अधिकारी) एकात्मिक बालविकास विभाग–सदस्य तसेच आठव्या आर्थिक गणनेसाठी महानगरपालिका आयुक्त (सर्व) हे महानगरपालिका प्रभारी अधिकारी, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे प्रादेशिक सहसंचालक (सर्व) हे विभागीय नोडल अधिकारी व उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय (सर्व) हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.