अवघ्या १२ तासाच्या आत हत्येचा उलगडा; फिर्यादीच निघाला आरोपी
सोलापूर : जन्मदाता बाप ... मागील अनेक वर्षापासून घरातील सर्वांना दारू पिऊन शिवीगाळ व त्रास देत असल्याने त्या त्रासास कंटाळून वडिल घरी आल्यानंतर त्यांना एका खोलीमध्ये कोंडून लोखंडी गजाने सर्वांगावर मारहाण करून हत्या केल्याची कबुली मुलाने दिलीय. पांडूरंग चंद्रकांत सावंत असं मृताचे नांव असून, जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासात उलगडा करण्यात यश आलं आहे.
बुधवारी, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७:४५ वा. चे पूर्वी अनोळखी इसमाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून, कोणत्यातरी अज्ञात हत्याराने डोकीत, तोंडावर जबर मारहाण करून जिवे ठार मारले, व त्यांची मोटार सायकल शिंगणापूर-नातेपुते रस्त्यावर भवानी घाट, पिंपरी येथे, घाटाच्या तिसरे वळण संपल्यानंतर रस्त्याच्या खाली पाच फूट अंतरावर टाकून खून केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
मृत अनोळखी व्यक्ती माळशिरस तालुक्यातील मौजे कोंडबावी या गांवातील असल्याची माहिती मिळाली. मृताचा मुलगा सुरज सावंत याने प्रेत ओळखून, वडिल पांडूरंग चंद्रकांत सावंत याचेच प्रेत असल्याचे सांगितले. त्यानुसार सुरज पांडूरंग सावंत (वय-२४ वर्षे) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नातेपुते पोलीस ठाण्यात, भादविसंक ३०२, २०१ प्रमाणे अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या खूनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देण्यासंबंधी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जून भोसले (पंढरपूर उपविभाग, अतिरिक्त चार्ज अकलूज उपविभाग) तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांचे पथकास योग्य त्या मार्गदर्शन सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक निंबाळकर व सपोनि नागनाथ खूणे व त्यांचे पथक असे घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
या गुन्ह्यातील मृत कोंडबावी गांवचा रहिवाशी असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथकास मृताच्या राहते गांवी जाऊन मृताबाबत माहिती काढण्याबाबत मार्गदर्शनपर मूचना देऊन रवाना केले होते.
त्या आधारे सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथकाने कोंडबावी गांवी जाऊन माहिती घेत असताना, त्यांना गोपनीयरित्या मिळालेली माहिती गुन्ह्याच्या तपासासाठी मोलाची ठरली. या गुन्ह्यातील मृत पांडूरंग चंद्रकांत सावंत, हा पूर्णपणे दारुच्या आहारी गेला होता. मागील अनेक वर्षापासून दारूच्या नशेत घरातील लोकांना शिवीगाळ करून त्रास करत होता. त्या त्रासास कंटाळून सदरचा गुन्हा हा मृताचा मुलगा फिर्यादी सुरज सावंत यानेच केला असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली.
त्यानंतर सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथकाने मृताचे अंत्यविधी कार्य पूर्ण झाल्यानंतर फिर्यादी सुरज सावंत (मयताचा मुलगा) यास कोंडबावी येथील राहते घरातून चौकशीकरीता ताब्यात घेतले. त्याचेकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता, प्रारंभी त्याने विसंगत अशी उत्तरे दिली, त्याचेकडे कौशल्यपूर्ण चौकशी करता, त्याने मद्यपी वडीलाकडून कुटुंबाला होत असलेल्या त्रासातून वडिलांची घरात कोंडून लोखंडी गजाने मारहाण करून हत्या केली.
त्यानंतर एका मोठ्या पिशवीमध्ये प्रेत भरून पिकअप वाहनात टाकून, मृताची मोटार सायकल बहिणीने चालवत नेऊन नातेपुते येथील शिंगणापूर भवानी घाटात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने काठाडात टाकून गुन्हा केल्याची कबुली दिली. मयताचा मुलगा सूरज सावंत यास नातेपुते पोलीस ठाणेच्या ताब्यात देऊन त्यास अटक करण्यात आली. सपोनि प्रविण सपांगे या गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जून भोसले (पंढरपूर उपविभाग, अतिरिक्त चार्ज अकलूज) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, सफौ/ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड यांनी बजावली.