Type Here to Get Search Results !

डॉ. आंबेडकर युथ असोसिएशनचे “ संविधान बचाव निर्धार अभियान " सुरु : उत्तमभैय्या नवघरे

२६ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे विभागीय मोर्चाचे आयोजन 

सोलापूर : देशात अलिकडच्या काही वर्षात घडत असलेल्या सर्व घटनाक्रमामुळे व बुध्यांक लकवा असलेल्या या सरकारकडून केंव्हा काय होईल, याचा भरोसा नाही. त्याच्या जागृतीसाठी डॉ. आंबेडकर युथ असोसिएशनने “ संविधान बचाव निर्धार अभियान " सुरु केले आहे. रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे विभागीय मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी, महिला असे १० ते १२ हजार संविधान सैनिक या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. आंबेडकर युथ असोसिएशनचे संस्थापक उत्तम भैय्या नवघरे यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.
 
मुळातच संघ परिवार व त्याच्या विचारसरणीशी निघडीत व्यक्ती, पक्ष, संघटना या बंधुता, समानता, सामाजिक न्याय, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता या मानवी मूल्यांच्या विरोधात स्वतंत्र प्राप्तीपासून आजपर्यंत कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदु कोडबिल असो की मंडल कमिशन असो, बाबासाहेब आंबेडकर हयात असताना ते आजपर्यंत खुलेपणाने व छुपेपणाने संघ परिवाराने बाबासाहेबांच्या, मानवतेच्या व समतेच्या मुल्यांना विरोध केल्याचे वारंवार सिध्द झाले असल्याचे प्रारंभी उत्तम भैय्या नवघरे यांनी म्हटले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना, नवघरे पुढे म्हणाले, अटल बिहारी सरकारने संविधान बदलणे, संविधानाचे पुनरावलोकन करणे यासाठी आयोग गठीत केला होता. संविधान प्रेमी, लोकशाहीवादी, बहुजनवादी आंबेडकरी विचारांच्या बुध्दीजीवी वर्गापासून आक्रमक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी अटल बिहारी सरकारच्या षडयंत्रकारी योजनेस हाणून पाडले होते.

त्याच विचाराने प्रेरीत असणाऱ्या व बहुमताने आलेल्या मोदी सरकारने दिल्ली येथे प्रधानमंत्री निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जंतरमंतरवर संविधानाच्या प्रति जाळण्याचे दु:स्साहस समाजकंटकांनी केले. त्यावेळी सरकार म्हणून मोदी सरकारने त्या आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. त्या घटनेमुळे आंबेडकरवादी जनतेमध्ये उद्रेक झाला. 

हल्ली जणू आरएसएसचे प्रचारक असणारे गोविंदाचार्य यांनी संविधान परत लिहिल्याची भाषा बोलणे, केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी आम्ही भारतीय संविधान बदलण्यासाठीच सत्तेत आलो आहोत, हे विधान करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक सल्लागार असणारे विवेक देबरॉय यांनी इंग्रजी वृत्तपत्रातून लेख लिहून नव्या राज्यघटनेचा विचार व्हायला हवा, असे मत मांडणे असेल, सुप्रीम कोर्टाचे वादग्रस्त सेवानिवृत्त न्यायमुर्ती व राज्यसभेचे खासदार यांनी संविधान बदलण्याबाबत राज्यसभेत वक्तव्य करणे या सर्व वक्तव्याकडे गंभीरतेने पाहणे गरजेचे आहे, असंही नवघरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

संस्थापक उत्तम भैय्या नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान बचाव निर्धार अभियान आयोजित करण्यात आले असून मोर्चाचे नेतृत्व डॉ. आंबेडकर युथ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नागेश कांबळे करणार आहेत. आंबेडकरी विचारवंत बबलू गायकवाड या मोर्चास मार्गदर्शन करणार आहेत. मोर्चा यशस्वी करण्यासाठी समीउल्ला शेख, शेखर बंगाळे, दिपक (आबा) चंदनशिवे, अॅड. बाबासाहेब वडवे, रवी सरवदे, प्रविण चाफाकरंडे, सोहेल शेख, ऋषिकेश मनलोर, अॅड. प्रशिक नवघरे आदि कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

या पत्रकार परिषदेस डॉ. माधुरी परपल्लिवार, यशपाल कांबळे, लक्ष्मण भोसले उपस्थित होते.