'त्या' घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन जागेत राष्ट्रध्वज डौलाने फडकतोय !

shivrajya patra

ऑगस्ट महिन्यात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिन सर्वत्र जल्लोष आणि उत्साहपूर्ण साजरा झाला. सोलापुरात गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या, मात्र पूर्णत्वास गेलेल्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटात संपन्न झाला. या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मी अन् अन्य सहकाऱ्यांनाही लाभलं. या क्षणाचा साक्षीदार म्हणून उभा असताना, एका जुन्या स्मृतिला आपसूकच उजाळा मिळाला. ती आठवण होती, सोलापूर जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केलेल्या एका संघर्षमय प्रसंगाची !

त्या प्रसंगी सोलापूर जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सभासदांनी एकत्र येऊन सर्वच शासनाचे कर्मचारी असले तरी सनदशीर मार्गाने दिलेल्या लढ्यामुळं हा विस्तिर्ण भूखंड एखाद्या राजकारणी व त्याच्या बगलबच्च्याचा श्रीखंड होऊ नये,  या एकमेव भावनेतून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी-सभासदांनी एकत्र येऊन, 'त्या' घटनेत शासनाच्या आदेशाची होळी केली होती. त्या होळीतच तत्कालीन राजकीय षडयंत्राची होळी झाली.

सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय दूध डेअरी कार्यरत होती. ती इमारतीत ठिकाणी तीन पाळ्यात सलग २४ तास कामकाज चालू राहायचे. असे असताना 'विनाश काले विपरीत बुध्दी' राज्याच्या तत्कालिन मंत्री महोदयांना सुचली. ती जागा कोल्हापूरच्या काही राजकीय कार्यकर्त्यांच्या घशात 'घास' घालण्याच्या उद्देशाने या दुध डेअरीचे हस्तांतरण करण्याचे ठरले. 
त्याप्रमाणे हस्तांतरणाचे १९८७ मध्ये राज्य शासनाने अध्यादेश जारी केले. त्याची कुणकुण राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या कार्यालयास लागली. यावेळी सोलापूरचे महापौर व पहिले दलित मित्र भिमराव जाधव गुरुजी हे देखील कर्मचारी संघटनेला योग्य दिशा देऊन मार्गदर्शन केले होते. ज्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला विशेष बळ मिळाले त्याची आठवण आजही येत आहे.

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जागृती निर्माण झाली. त्यावेळेच्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शंकरराव जाधव  व सर्व पदाधिकारी वर्गाची तातडीचे बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये दूध डेअरी बचाव कृती समितीची स्थापना करुन राज्य शासनाच्या खासगीकरणाला कडाडून विरोध करण्याचा पवित्रा घेत संघर्षाची लढाई सनदशीर मार्गाने सुरू केली.

१९८७ मध्ये नागपुरात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय होते. पंचवार्षिक अधिवेशन र. ग. कर्णिक यांनी बोलाविले होते. त्या अधिवेशनात खासगीकरणाला कडाडून विरोध करण्याची सर्वानुमते मंजूरी मिळाली. त्यावेळी लालबावटा कामगार युनियनचे कॉ. सुकोमोल सेन हेही अधिवेशास उपस्थित राहून कर्मचारी बांधवाना मोलाचे मार्गदर्शन केले. 

सुकोमोल सेन म्हणाले, राज्य सरकारने खासगीकरणाचे स्वप्न पाहत असेल तर देश संकटात जाईल आणि सुशिक्षित तरुणांची बेरोजगारी वाढेल, असेही तरुण वर्गांना उद्देशून इशारा दिला होता. 

त्यावेळी शंकरराव जाधव, ए.डी. चिनीवार, एस.एम. इनामदार, एम.जी. बागवान, प्रल्हाद चिंचोळकर, सत्यवान चौरे, अर्जून तरंगे, प्रकाश ईरकशेट्टी, सुमाकांत गायकवाड, रघुनाथ बनसोडे, मल्लिकार्जून शिंदे, उदयसिंह बायस, छाया इंगळे, कुसूम केत, सोलापूर नर्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षा शांता जाधव, सरस्वती गड्डम, गौतम इंगळे, लक्ष्मण पुतळे, दिनकर रणशृगांरे, भिमराव लोखंडे, आशुतोष नाटकर, नाना रणदिवे, रोहिदास राठोड, चंद्रकांत चलवादी, अनिल सुर्वे, भानुदास शिंदे, निवृत्ती बोराडे, नंदू चौगुले, मदन कुलकर्णी, सुभाष माने, गिरजप्पा व्होटकर, नागेश गायकवाड, सुरेश जाधव, नागनाथ इंगळे, किशोर सावळे, विरबक्षी चलवादी, इत्यादी दूध डेअरी बचाव कृती समितीमध्ये मोठ्या धाडसाने कोल्हापूर विभागातील राजकीय कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी डिसेंबर १९८७ च्या रात्रीचे १२ वाजल्यापासून ते डेअरीच ४ बाजूनी ३.३० पर्यंत संरक्षण करून हस्तांतरणाचे अध्यादेशाची पहाटे ३.३० वा. होळी केली. 

त्यात सोलापूर शासकीय दूध डेअरी व त्या शेजारील मोकळी जागा 'जैसे थे' राहिली, म्हणून दूध डेअरी शेजारच्या मोकळ्या जागेवर आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्याला अनुसरुन नियोजन भवन उभे राहिले. केवळ सोलापूर जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शंकर जाधव आणि दूध डेअरी बचाव कृती समितीचे योगदान मोठे आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाहीत, हे मात्र निश्चित !

रघुनाथ बनसोडे, सोलापूर.
To Top