संघर्षयोध्दा जरांगे-पाटील यांच्या सोलापूरसह जिल्ह्यात ५ जाहीर सभा

shivrajya patra
सोलापूर : सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने मराठा आरक्षणाचा संघर्ष योध्दा, मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचा विडा उचलणारे, परिणामी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, आणी सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले मिळावे, म्हणून १७ दिवस अन्न आणि पाणी त्याग करणारे मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा, ०५ ऑक्टोबर रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली असल्याची सकल मराठा समाज संघटनेचे माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अंतरवाली-सराटी येथे होणाऱ्या मराठा आरक्षण परिषदेला हजर राहण्याचे आवाहन करण्यासाठी जरांगे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ५८ मोर्चे काढले. पण सरकारकडून न टिकणारे आरक्षण देऊन समाजाची फसवणूक केली असल्याची खंत प्रारंभी माऊली पवार यांनी व्यक्त
 केली.

त्यानंतर समाजाला आरक्षण  मिळावे म्हणून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने मंत्री महोदयांकडे आणि शासन दरबारी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न केले. परंतु शासन मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, असे फक्त आश्वासन देत आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यापासून सरकार तर्फे कोणताही ठोस कार्यक्रम हाती घेतला नाही. महाआघाडी चे सरकार असताना, मराठा आरक्षण हे आघाडी सरकारने घालवले, असे सांगून राज्यभर भा. ज .पा तर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून आंदोलने करत होता. तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे तर जाहीरपणे सांगत होते की, आम्हाला सत्ता द्या मराठ्यांना आरक्षण देतो, मात्र त्याचाही सत्ताधारी मंडळींना विसर पडला आहे.

परंतु आज देवेंद्र फडणवीस सत्तेत येऊन वर्ष उलटून गेले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे फक्त आश्वासन देण्यापलिकडे कोणती ही ठोस कृती करत नाहीत. त्यामुळे सामान्य मराठा तरुणांचा सरकारवर विश्वास राहिला नाही.  इतके दिवस शांततामय मार्गाने आंदोलन केले .परंतु आता मराठा तरुणांचा संयम सुटत चालला आहे, असेही माऊली पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. 

जरांगे-पाटील यांनी लोकशाही मार्गाने आंतरावली सराटी येथे आंदोलन केले. परंतु सरकारने त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करायला सांगितला. गोळीबार केला, महिलांची डोकी फोडली, तरी सुध्दा आपल्या भूमिकेपासून तसूभरही न ढळता मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपले उपोषण सुरूच ठेवले. सरकारला ३० दिवसाची मुदत दिली. परंतु सरकारवर दबाव रहावा, म्हणून  आणि सरकारला मराठा समाजाची ताकद दिसावी, म्हणून आंतरवली येथे १०० एकर जागेमध्ये भव्य आरक्षण परिषद घेत आहेत. 

त्या परिषदेला लाखो मराठा समाज बांधवांनी हजर राहावे, म्हणून जरांगे पाटील महाराष्ट्र भर जाऊन प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांना आरक्षण  परिषदेला हजर राहण्याचे आवाहन करण्यासाठी जरांगे-पाटील सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरासह, मंगळवेढा, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर या तालुक्याच्या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.त्यासाठी ते ५ आणि ६ तारखेला  सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. 

या सभेला हजारो मराठा बांधवांनी हजर राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने करण्यात येत असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने आज शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेत माऊली पवार, प्रा. गणेश देशमुख, प्रकाश ननवरे, राजन जाधव, श्रीकांत डांगे, सूर्यकांत पाटील, सचिन टिकते, जी. के. देशमुख उपस्थित होते.
To Top