अवघ्या दोन तासात वीज कनेक्शन !
करमाळा : होय, अवघ्या दोन तासात कनेक्शन ! हे वाक्य कानी पडलं अथवा वाचण्यात आलं तर अविश्वयनिय वाटेल, कारणही तसंच आहे. गेल्या अनेक दशकांपासून लालफितीच्या कारभारावर कोरडे ओढणारा सामान्य माणूस 'सरकारी काम, ६ महिने थांब' अशा व्यवस्थेत जिणं जगतोय. एखाद्या मागणीला पूर्णत्वास हात 'ओले' करावे लागतात, असा चार-चौघांना कटू अनुभव जणू एक सिध्दांत असल्याचेही बोलणारा वर्ग मोठा आहे.
बहुमान्य सिध्दांताला अपवाद असतो, असंही म्हणतात.
'सरकारी काम, ६ महिने थांब' या सिध्दांताला अपवाद ठरावं असं काम करमाळा महावितरण कंपनीने आपल्या कार्यातून दाखवून दिलंय.
करमाळा शहरात वीज कनेक्शन घेण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवशंकर जगदाळे व खत दुकानदार सुमित शिवाजी सरडे हे दोघे महावितरण कंपनीत गेले. उभयतांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यापासून अवघ्या दोन तासाच्या आतच करमाळा शहर चे सहाय्यक अभियंता रघुनाथ शिंदे व त्यांचे कर्मचारी कु. राजनंदा जंगले, मिटू वीर, तात्या वीर यांनी मीटर बसवून वीज कनेक्शन चालू करून जणू धक्का दिला, तोही आश्चर्याचा !
महावितरण कंपनीच्या या जलद सेवेबद्दल समाधान आणि त्या टिमचं कौतुक होत आहे.