सांस्कृतिक; आरोग्य आणि पर्यावरण विषयक उपक्रम राबविण्याचे आवाहन
सोलापूर : गणेशोत्सव २०२३ चे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवारी, १२ सप्टेंबर रोजी ११.४० वा. पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी, गणेशोत्सव मध्यवर्ती व सार्वजनिक जयंती उत्सवाचे पदाधिकारी, सदस्य, यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे यांनी प्रस्तावना करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. सर्वत्र १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा होत आहे. यापूर्वी ०६ ऑगस्ट रोजी मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविणेसंबंधी सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सवा करीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जबरदस्तीने वर्गणी मागू नये, असेही सूचित करण्यात आले.
सर्व गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मंडळाची रितसर धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करावी. उत्सव काळात सर्व मंडळानी सीसीटीव्ही कॅमेरॅची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा २/३ भाग मोकळा सोडावा. मोकाट जनावरांपासून मुर्ती धोका होणार नाही, याची दक्षता घ्यावी. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचे पावित्र्य राखावे, मंडळांकडुन जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्रथम पसंती द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणाबाबत जनजागृती करावी. देखावे, रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांकरीता स्वतंत्र रांगेची सोय करावी प्रवेशाकरीता आणि बाहेर जाण्यास स्वतंत्र गेट असावेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
गणेशोत्सव मंडळांनी महावितरण विभागाकडुन अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी, जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्ट सर्कीट होऊन इजा अथवा धोका होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर टी ओ कडून तपासणी करावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. मिरवणूक संवेदनशिल ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये. मिरवणुकीच्या वेळी ट्रिपलशिट फिरू नये, वाहनांचे सायलेंन्सरच्या पुंगळ्या काढून वाहने चालवू नये, हुल्लडबाजी करू नये.
मिरवणुक मार्गात बदल करू नये. इतर धर्मांच्या भावना दुखावणार नाही, यांची काटेकोर दक्षता घ्यावी. मंडळाने स्थापन केलेल्या गणेश मूर्ती समोर स्वयंसेवक सतत हजर राहतील, मुर्तीची देखभाल करतील, याची पुरेपुर काळजी घ्यावी. सोशल मिडीयावरुन काही अक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.
गणेशोत्सव-२०२३ मंडळानी ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्यावी. ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सूचना मांडल्या. या सूचनांचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आर टी ओ धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा बघून समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले.
पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसन केले. उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल. शासनाने नेमून दिलेल्या सुचना पाळल्या पाहिजेत. तसेच योग्य तो बंदोबस्त नेमू, असे सांगून गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छा देऊन बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.