सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर परिसरातील होटेल कंट्रीसाईड व ग्रीनवूड या ठिकाणी बुधवारी, सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या धाडीत २ हॉटेल चालकांसह १० मद्यपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना न्यायालयासमोर उभे केला असता, न्यायालयाने २ हॉटेल चालकांसह १० मद्यपी ग्राहकांना ८० हजारांचा दंड ठोठावला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक राहूल बांगर यांच्या पथकाने विजापूर रोडवरील सोरेगाव परिसरातील हॉटेल ग्रीनवुड या होटेलवर छापा टाकला असता चालक युवराज विष्णू भोसले (वय-३२ वर्षे) हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आला. त्याच्यासह ५ मद्यपी ग्राहक अमोल मुरलीधर साठे, आकाश मल्लिनाथ चव्हाण, अमीर सफिक शेख, अजित बंडू राठोड व राहूल राजाराम भोसले यांना अटक करण्यात आली.
एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकू तांडा येथील हॉटेल कंट्रीसाईड या ठिकाणी छापा टाकून हॉटेल चालक मनिष ईश्वर घनाते (वय -३२ वर्षे) व 5 मद्यपी ग्राहक नामे मल्लिनाथ चंद्रशेखर नन्ना, रविराज मनवेल सर्वगोड, मनवेल देवराव सर्वगोड, शेखर राम माने आणि मनोहर रुद्राप्पा बनसोडे यांना अटक केली.
दोन्ही गुन्ह्यांचे दोषारोपपत्र गुरुवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांचे न्यायालयात सादर केले असता, दोन्ही हॉटेल चालकास प्रत्येकी २५ हजार रुपये दंड व दहा मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी ०३ हजार रुपये दंड असा एकूण ८० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक सूरज कुसळे, निरिक्षक राहूल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरिक्षक अलीम शेख, जवान किरण खंदारे, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी यांच्या पथकाने पार पाडली.
आवाहन
ढाब्यांवर दारु विक्री करणे किंवा ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे, त्याठिकाणी बसून दारु पिणे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या धाब्यांची या विभागाकडून सातत्याने तपासणी सुरु असून याचे उल्लंघन करणाऱ्या ढाबा चालक व ग्राहकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिला आहे.