...येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

shivrajya patra

सर्वांच्या सहकार्यातून सोलापूर जिल्ह्यात विविध विकासात्मक कामे करणे शक्य झाले

अधिकारी कर्मचाऱ्यांना संवेदनशीलता ठेवून रजाही दिल्या पाहिजेत

जिल्हाधिकारी कठोर राहिले तरच प्रशासन अधिक गतिमान पद्धतीने काम करते

महसूल व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत बदलीनिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार तर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांचे स्वागत

सोलापूर : येथील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हाती घेतलेली जवळपास सर्व कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी जे प्रेम व सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे. तसेच 3 एप्रिल 2026 रोजी माझी बदली नागपूर येथे झाली असली तरी सोलापूर जिल्हा कायमस्वरूपी माझ्या मनात आहे व राहील, असे भावनिक उद्गार तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी काढले.

कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर येथे 22 जुलै 2023 ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यांच्याकडून जवळपास तीन वर्षाच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न, कामे हाताळण्यात आली. त्यांनी गतवर्षीच्या अतिवृष्टीत वाडी-वस्तीपर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जवळून अनुभवत दिलासा दिला होता.

(संग्रहीत छायाचित्र)

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयान यावेळी म्हणाले की, मागील दोन महिन्यापासून जिल्हाधिकारी म्हणून आपण सोलापूरमध्ये काम करत असून तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथे जी प्रशासकीय कामकाजाची चौकट निर्माण केली आहे, त्यामुळे कामे करताना कोणतीही अडचण येत नाही. 

येथील सर्व अधिकारी-कर्मचारी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पडतात. तसेच आशीर्वाद यांनी जे आपले अनुभव मला सांगितलेले आहेत, त्या पद्धतीने कामकाज करून सोलापूर जिल्हा विविध विकास कामात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी की, कुशल जैन यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कामाचे व कार्यपद्धतीचे कौतुक केले.

सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय कारभारात तीन वर्षे कुशल नेतृत्व व मार्गदर्शन देणारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा निरोप समारंभ सोमवारी सायंकाळी पार पडला. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रास्ताविक करून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. 

यामध्ये तहसीलदार मदन जाधव यांनी प्रशासकीय अनुभव शेअर करत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे कामकाज सुलभ झाल्याचे सांगितले.  उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या निर्णयक्षमतेची प्रशंसा केली. 

जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. महत्वाच्या निर्णयांची माहिती देत त्यांनी कुशल नेतृत्व अधोरेखित केले. 

उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर व उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनीही मनोगत व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. 

महसूल संघटनेचे पदाधिकारी शंतनू गायकवाड रविराज नसते यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. तसेच सर्व संघटनाचे पदाधिकारी व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना दिलेले प्रोत्साहन, समारंभात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तर तहसील चे तहसीलदार निलेश पाटील यांनी केले तर अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी आभार मानले. 

या कार्यक्रमास जिल्ह्यातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****


To Top