सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील 03 सराईत आरोपींना सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून 02 वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय. इम्रान रफीक शेख, राजु उर्फ राजेसिंग राम राठोड आणि अब्दुल वहाब नबीलाल शेख अशी तडीपारांची नावे असल्याचे सांगण्यात आलंय.
येथील मुरारजी पेठ, पाटील चाळीतील रहिवासी इम्रान रफिक शेख (वय-२३ वर्षे) याच्याविरुध्द सन 2019, 2023, 2024 आणि 2025 या कालावधीत, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा-मारामारी करणे, साथीदारांसह सामान्य नागरीकांना मारहाण करुन दहशत निर्माण करणे, महिला अत्याचाराचे गुन्हे करणे आणि सरकारी नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.
सन 2021, 2023 आणि 2024 या कालावधीमध्ये सामान्य नागरीकांना साथीदारांसह मारहाण करुन दहशत निर्माण करणे, नागरीकांना मारहाण करुन जबरदस्तीने पैसे काढून घेणे आणि जबरदस्तीने पळवून नेऊन दुखापत करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या राजु उर्फ राजेसिंग राम राठोड (रा. 197, शुक्रवार पेठ, माणिक चौक, सोलापूर) या 25 वर्षीय तरुणाविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांच्याकडं सादर करण्यात आला होता.
तिसऱ्या तडीपाराविरुध्द मंगळसूत्र चोरी, मोबाईल चोरी करणे यासारखे एकुण 06 गुन्हे दाखल होते. त्यापैकी 02 गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने अब्दुल वहाब नबीलाल शेख (वय - 37 वर्षे) याला शिक्षा दिल्याने त्याच्याविरुध्द सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून अब्दुल वहाब शेख (रा. 293, सोनिया नगर, 02 नंबर झोपडपट्टी, विजापूर नाका, सोलापूर) याच्याविरुध्द तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांच्याकडं सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावांच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन इम्रान रफिक शेख, राजु उर्फ राजेसिंग राम राठोड आणि अब्दुल वहाब नबीलाल शेख या तिघांना मंगळवारी,05 मे रोजी सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्ह्यातून 02 वर्षाकरीता तडीपार केलंय.
