ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र व्यवस्था : एम राज कुमार

shivrajya patra

गणेशोत्सव २०२५ चे अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पार पडली शांतता समितीची बैठक 

सोलापूर : गणेशोत्सव २०२५ चे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी, गणेशोत्सव मध्यवर्ती व सार्वजनिक जयंती उत्सवाचे पदाधिकारी, सदस्य, यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त एम. राजकुमार होते. 

या बैठकीची प्रस्तावना पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. २७ ऑगस्ट रोजी ते ०६ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव २०२५ साजरा करण्यात येणार आहे. ०६ सप्टेंबर रोजी मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविणेबाबत सुचना देण्यात आल्या. 

देखावे, रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिrला व पुरूष भाविकांकरीता स्वतंत्र रांगेची सोय करावी प्रवेशाकरीता आणि बाहेर जाण्यास स्वतंत्र गेट असावेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. सोलापूर शहर हे डीजे मुक्त होण्याबाबत सर्व मंडळाबरोबर चर्चा करण्यात आली आहे.

त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्या नंतर सदर सुचनेचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आर टी ओ, धर्मादाय आयुक्तकार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा बघून समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले.

पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले. 

या बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार,  पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-१) पोमण, (विभाग-२) खिरडकर, गुन्हे शाखा राजन माने,  खिरडकर (वाहतुक शाखा), तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूरकडील श्रीमती एस. जी. आकुलवार, अभियंता गोपाल मच्छिद्र, एम. एम. आरोडा (पीडब्ल्यूडी ऑफिस), मोरे (महावितरण अति. कार्यकारी अभियंता), चॅरेटी कमिशन ऑफ सोलापूर ए.एन.शेख, सोलापूर अग्नीशामक दलाचे रावसाहेब सलगर. डॉ ऋषीकेश डेरे (सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर), आर.टी.ओ.चे मुख्य अधिकारी पाटील तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, व शांतता कमिटीचे सदस्य, व पत्रकार बंधु उपस्थित होते.

... चौकट 

आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना द्यावा अग्रक्रम

मोकाट जनावरांपासून मुर्तीला धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचे पावित्र्य राखावे, मंडळांकडुन जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंदी द्यावी. तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणाबाबत जनजागृती करावी. 

... चौकट 

मागू नये जबरदस्तीने वर्गणी

गणेशोत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जबरदस्तीने वर्गणी मागू नये. सर्व मंडळांनी आपल्या मंडळाची रितसर धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करावी. उत्सव काळात सर्व मंडळानी सीसीटीव्ही कॅमेरेंची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा २/३ भाग मोकळा सोडावा, असंही यावेळी सूचित करण्यात आले.

... चौकट

मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर टी ओ कडून तपासणी आवश्यक

सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. मंडाळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी, जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्टसर्कीट होऊन इजा अथवा धोका होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर टी ओ कडून तपासणी करावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. मिरवणुक संवेदनशिल ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेऊ नये, असंही यावेळी सूचित करण्यात आले.

... चौकट 

मंडळाने स्थापन केलेल्या गणेश मुर्तीसमोर सतत हजर राहतील स्वयंसेवक

मिरवणुकीच्या वेळी ट्रिपलशिट फिरू नये, वाहनांचे सायलेंन्सर च्या पुंगळ्या काढून वाहने चालवू नये व हुल्लडबाजी करू नये. मिरवणुक मार्गात बदल करू नये. इतर धर्मांच्या भावना दुखावणार नाही यांची काटेकोर दक्षता घ्यावी, मंडळाने स्थापन केलेल्या गणेश मुर्तीसमोर स्वयंसेवक सतत हजर राहतील व मुर्तीची देखभाल करतील याची पुरेपुर काळजी घ्यावी.

सोशल मिडीयावरुन काही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे. 

... चौकट 

ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र व्यवस्था 

गणेशोत्सव-२०२५ मंडळानी ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी. ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

... चौकट 

पोलीस आयुक्तांच्या सूचना अन् शुभेच्छा !

उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, 

कोणीही कायदा हातात घेऊ नये, 

कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, 

शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे, 

मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये,

नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल. 

शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत. तसेच योग्य तो बंदोबस्त नेमू, असे सांगून पोलीस आयुक्तांनी गणेश उत्सवानिमित्त शहरवासियांना शुभेच्छा देऊन बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.

To Top