सोलापूर : कृषि विभाग महाराष्ट्र शासन, आत्मा सोलापूर व जिल्हा परिषद सोलापूर कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी, 01 जुलै रोजी कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त "कृषि दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 9.30 वाजता पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषि अधिक्षक शुक्राचार्य भोसले, प्रकल्प संचालक, आत्मा कांतप्पा खोत, कृषि विकास अधिकारी हरिदास हावळे उपस्थित होते. विशेष व्याख्याते म्हणून तुर लागवडीची पंचसूत्री आणि खरीप नियोजन अमोल शास्त्री व सोयाबीन लागवड तंत्रज्ञान डॉ. लालासाहेब तांबडे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले.
यावेळी शेतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. प्रशस्तीपत्र व रोपवाटिकेतील रोपे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे, जिल्हा परिषदेअंतर्गत जि.प. सेस योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आणि बायोगॅस योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या विस्तार अधिकारी (कृषी) व कृषि अधिकाऱ्यांचा देखील सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शुक्राचार्य भोसले यांनी अध्यक्षीय भाषणातून आधुनिक कृषी पद्धती, तण नियंत्रण, योग्य खत वापर, व कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचे आवाहन केले.
शेतकन्यांना खरीप हंगामाचे शास्त्रशुद्ध नियोजन, तुर व सोयाबीन लागवडीत नवे तंत्रज्ञान, योजनांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार, कृषी विभागाच्या 'सेंद्रिय व उत्पादनक्षम शेती' दृष्टिकोनावर भर "शेतीत विज्ञानाची सांगड घालूनच शाश्वत उत्पन्न साधता येईल" हे कार्यक्रमाचे मुख्य बोधवाक्य ठरले. आणि कृषि विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शेतकरी बांधव, अधिकारी व कर्मचारी यांचं आभार व्यक्त केले.
