सोलापूर जिल्ह्यात ज्या पक्ष्यांचा अधिवास दुर्मिळच आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपक्षी असलेले हरियाल या पक्षाचे दर्शन अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे झाले आहे. सुमारे ४० ते ५० एवढ्या मोठ्या संख्येत असलेला हरियाल पक्षांचा थवा मैंदर्गीतील A- One हॉटेल परिसरात असलेल्या सुमारे 70 ते 80 वर्ष जुन्या वटवृक्षाच्या पिकलेल्या फळावर ताव मारण्यासाठी आलेले आहेत.
महाराष्ट्र शासनाने या पक्षाला राज्य पक्षी म्हणून घोषित केले असून आजही अनेकांना महाराष्ट्राचे राज्यपक्षी हरियाल आहे, हे माहिती नाही. कबूतर वर्गात मोडणारा हा पक्षी इतर कबुतरांप्रमाणेच गुबगुबीत असून रंगाने मात्र भिन्न असतात. मुख्य रंग हिरवट पिवळा असतो आणि पायही पिवळे असतात, पिवळ्या पायामुळे या पक्षाला ओळखणे सोपे जाते.
हरियाल पक्षी पूर्णपणे शुध्द शाकाहारी असून ते सदाहरित वने, पानझडी वने इत्यादी ठिकाणी निवास करतात आणि वड, पिंपळ, उंबर व अंजीर यांसारख्या वृक्षांवर तसेच अधूनमधून शहरांतील बागांमध्येही ते दिसून येतात. ते क्वचित जोडीने, तर बहुधा थव्याने वावरतात. फळे तसेच कळ्या, कोंब व इतर धान्ये खातो. खासकरून वडाची आणि पिंपळाची फळे खाण्यासाठी त्यांचे मोठाले थवे या झाडांवर जमतात.
त्यांच्या शरीराचा रंग या झाडांच्या पानांशी मिळता-जुळता असल्याने ते सहजासहजी दिसून येत नाहीत. हरियाल स्वभावाने लाजाळू असून ते क्वचितच जमिनीवर उतरतात. त्यांचे उड्डाण थेट आणि जलद असल्यामुळे उड्डाण करताना त्यांच्या पंखांच्या फडफडण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो.
त्यांच्या विणीचा हंगाम मार्च ते जून असा असतो. या काळात मादीला आकर्षित करण्यासाठी नर मादीसमोर आल्यावर गळा व छाती फुगवून चालतात, पंख खाली झुकवितात, नंतर दिमाखात चालतात आणि डोके खाली वाकवून सतत शीळ घातल्यासारखा मंजूळ आवाज करत राहतात. मादीसुद्धा नराला अशाच प्रकारे, परंतु सौम्यपणे प्रतिसाद देते. त्यांचे घरटे अन्य कबुतरांसारखेच एखाद्या मंचासारखे सपाट असते आणि पानांमध्ये दडविलेले असते. मादी १-२ पांढरी, चकचकीत अंडी घालते. उबवण काल १३–१५ दिवसांचा असतो. अंडी उबविण्याचे तसेच पिलांना अन्न भरविण्याचे काम नर-मादी दोघेही करतात.
विशेष बाब ही आहे की, अरविंद कुंभार लिखित 'पक्षांची दुनिया' या पुस्तकात असे वाचनात आले आहे की, अंड्यातून पिल्ले जन्माला आल्यानंतर मादी त्यांची विशेष काळजी घेते, मादींच्या वक्षस्थळातील ग्रंथींमधून एक विशिष्ट चिकट पदार्थाचा स्त्राव होतो व तो स्त्राव नवजात पिल्लांना भरवला जातो. या स्रावातील पोषणामुळे पिल्लांची वाढ अतिशय वेगाने होते. इंग्रजीत या स्त्रावाला "पिजन मिल्क" असे म्हणतात.
शिवभार : शब्दांकन - योगेश कबाडे.